साठ्यांची जी ७ - ८ घरे होती, त्यातले अण्णांचे घर खुप पुर्वीच बंद झाले. अजून दोन मधे केंव्हातरी बंद झाली. आत्ताचे (२०१५) मालक ८० वर्षांचे आहेत. अजून ५-६ वर्षे राहातील एकटे, केंव्हांतरी त्यांना जावेच लागेल मुलांकडे. म्हणजे हे ही बंद होईल. आपले घर त्यांनी घेतले, त्यांचे घ्यायला गावातील साठे पुढे येतिल का? त्यांना ते शक्य होईल का हा प्रश्ण आहे. बाकी सारी मुसलमान वस्ती, कदाचित तेच असतिल संभाव्य गिर्हाईक. केंव्हा तरी मागे, साठ्यांच्या शिरळ शाखेचा मुळ पुरूष स्वता:चे मुळ स्थान सोडून पोटासाठी असाच या गावात आला असेल, स्थिर झाला असेल, वंशज ईथे नांदतिल म्हणून घर जमिनजूमला केला असेल. तो जसा तेंव्हा घराबाहेर पडला, परत मुळ जागी परतून गेला नाही, तेच त्याचे आत्ताचे वंशज करताहेत. सारे जग असेच चालते. ऊत्पती, स्थिति, लय हे सर्वांसाठीच शाश्वत हे खरे. हे समजते, बुध्दीला पटते. पण म्हणून मनाला लागलेली हुरहूर पटकन कमी होत नाही.
ही कंपाऊंड भिंत जुन्या वेळच्या घराची बाकी आहे.